बारामती येथील ‘कृषिक 2025’ प्रदर्शनात एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीची प्रात्यक्षिके दाखवणार

एआय तंत्रज्ञान आधारित ऊस शेती प्रात्यक्षिक

बारामती, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत लाभदायक ठरत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच जास्त उत्पन्न मिळविण्याची संधी मिळत आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त उपक्रमातून राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतात सध्या प्रायोगिक तत्त्वावर एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती करण्यात आली आहे.

https://x.com/KVKBaramati/status/1875848973489209849?t=BuouesGZaOugJh3z8aFQ-A&s=19

कृषिक प्रदर्शनात एआय वरील ऊस शेती

आधुनिक शेतीच्या विकासासाठी एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून देण्यासाठी बारामती येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीची तसेच उत्पादनाच्या पद्धतीची प्रात्यक्षिके दाखविली जातील. शेतकऱ्यांना थेट एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याच्या फायद्यांची माहिती मिळेल. त्या आधारावर शेतकरी आपले कृषी व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने चालवू शकतील. तसेच या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता येईल आणि सोबतच त्याचा लाभ कसा घ्यायचा? याची माहितीही त्यांना मिळेल.

शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळणार

ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळत आहेत. एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून मातीच्या स्थिती, हवामानातील बदल आणि पिकाच्या वाढीचा अचूक माहिती मिळण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी पिकांचे व्यवस्थापन करता येते. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कीड आणि रोगाची माहिती मिळते. त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी एआयचा वापर केला जातो. यामुळे पिकांचे संरक्षण होते आणि रासायनिक खते व औषधांचा वापर कमी होतो.

एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान!

ऊसाला मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. एआयच्या मदतीने शेतकऱ्यांना पाणी वापराचे योग्य प्रमाण ठरविण्यात मदत मिळते. त्यामुळे पाण्याची बचत होते. याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्या वेळेला, किती खते, पाणी, औषध आणि इतर संसाधनांचा वापर करावा? याचे अचूक मार्गदर्शन एआय तंत्रज्ञान देऊ शकते. तसेच एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन खर्चात बचत होते. योग्य मार्गदर्शनामुळे पिकांचा दर्जा आणि उत्पादन प्रमाण वाढते. एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनामध्ये एक मोठा बदल घडवला जात आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना निसर्गाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. तर एआय तंत्रज्ञानाच्या फायद्यांची माहिती मिळवण्यासाठी बारामती येथील कृषिक प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *