राज्य सरकारकडून अहमदनगर शहराचे नामांतरण! पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे असणार नाव

मुंबई, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्य मंत्रिमंडळाची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्य सरकारने अहमदनगर शहराचे नामांतर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अहमदनगर शहराचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असणार आहे. मागील काळापासून अहमदनगर शहराचे नामांतर करण्याची मागणी केली जात होती. ही मागणी सरकारने मान्य केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडून घेण्यात आलेला हा मोठा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे.

वेल्हे तालुक्याचे देखील नामांतर!

त्याचबरोबर राज्य सरकारने या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे देखील नामांतर करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार, वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड असे असणार आहे. सोबतच मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यात येणार असल्याचे देखील यावेळी राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने अहमदनगर शहराचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

अजित पवारांनी मानले आभार!

“अहमदनगर शहराचं नाव ‘अहिल्यानगर’ करण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानतो. राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. या निर्णयानं अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्त्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचं तसंच समस्त महाराष्ट्रवासियांचं मी मनापासून अभिनंदन करतो,” असे अजित पवार यांनी ट्विट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *