आग्रा, 20 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.19) आग्रा किल्ल्यावर ‘शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का 2025’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र सरकार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमातून केली आहे.
https://x.com/ANI/status/1892257447685083303?t=1VbPd4X–nW1MpDHoof4TA&s=19
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान होण्याआधी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा व शक्ती मागून आले. आज त्यांच्याच नेतृत्वाखाली भारत जागतिक पटलावर प्रतिष्ठा मिळवत आहे. पंतप्रधान मोदींनी शिवरायांच्या 12 किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसाठी नामांकन दाखल केले असून, हे ऐतिहासिक पाऊल महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आग्रा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून दिले. औरंगजेबाने केलेला अपमान सहन न करता महाराजांनी दरबारात गर्जना केली आणि नंतर चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर नजरकैदेतून सुटका मिळवली. त्यानंतर स्वराज्यात परत येऊन त्यांनी 24 किल्ल्यांवर पुन्हा स्वराज्याचा झेंडा फडकवला, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
शिवरायांचे भव्य स्मारक
दरम्यान रामसिंगची कोठी, जिथे औरंगजेबाने शिवरायांना कैदेत ठेवले होते, त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या स्मारकाला ताज महालपेक्षा जास्त पर्यटक भेट देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकार ही जमीन ताब्यात घेईल. या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री योगेंद्र उपाध्याय, खासदार राजकुमार चाहर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्राचे मंत्री अॅड. आशिष शेलार, आमदार परिणय फुके, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील, तसेच ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता विकी कौशल आणि निर्माते दिनेश विजयन आदी मान्यवर उपस्थित होते.