जिओ पाठोपाठ एअरटेलचा देखील ग्राहकांना झटका! रिचार्जच्या किंमतीत मोठी वाढ

दिल्ली, 28 जून: (विश्वजीत खाटमोडे) जिओ पाठोपाठ एअरटेल कंपनीने देखील आज आपल्या रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. ही दरवाढ 3 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून फोन रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. या दरवाढीचे निवेदन दोन्ही कंपन्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आता इतर टेलिकॉम कंपन्या देखील आपले रिचार्ज प्लॅन महाग करू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

https://x.com/ANI/status/1806308580494110852?s=19

जिओ कंपनीचे रिचार्ज महाग

तत्पूर्वी, जिओ कंपनीने काल सर्वप्रथम त्यांच्या रिचार्जच्या किमतीत 3 जुलैपासून 12 ते 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यासोबतच जिओ कंपनीने मोफत 5G वापरणाऱ्या ग्राहकांना देखील झटका दिला आहे. केवळ 2GB आणि त्यावरील सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G सेवा उपलब्ध असेल, असे जिओ कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या नवीन दरवाढीनुसार, जिओचा सर्वात लोकप्रिय 239 रुपयांचा प्लॅन आता 299 रुपये किमतीला झाला आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. त्याची वैधता 28 दिवस आहे. तसेच जिओचा 155 रुपयांचा असलेला सर्वात स्वस्त प्लॅन आता 189 रुपयांना झाला आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येत आहे. तर दररोज 2GB आणि अनलिमिटेड कॉलिंग असलेला 299 रुपयांचा प्लॅन आता 349 रुपयांना झाला आहे. त्याची वैधता 28 दिवस आहे. याशिवाय, 84 दिवसांची वैधता असलेला 666 रुपयांचा रिचार्ज 799 रुपयांना झाला आहे. तसेच 15 रुपयांचा 1GB डेटा असलेला रिचार्ज आता 19 रुपयांना झाला आहे. यांसारखे जिओ कंपनीचे अनेक रिचार्ज प्लॅन येत्या 3 जुलैपासून महागणार आहे.

https://x.com/ANI/status/1806541448764141936?s=19

एअरटेलचे प्लॅन महागले!

रिलायन्स जिओने काल रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर काही तासांतच एअरटेलने देखील आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ 3 जुलैपासून लागू होणार आहे. एअरटेलने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 10 ते 21 टक्क्यांची वाढ केली आहे. या नवीन किंमतीनुसार, एअरटेलचा 179 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 199 रुपयांमध्ये मिळेल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच 84 दिवसांची वैधता असलेला 455 रुपयांचा प्लान घेतला तर आता तुम्हाला त्यासाठी 509 रुपये खर्च करावे लागतील. तसेच 19 रुपयांचा 1GB डेटा असलेला रिचार्ज आता 22 रुपयांना झाला आहे. याशिवाय एअरटेल कंपनीने आपल्या अनेक रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 3 जुलैपासून वाढ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *