मुंबई, 02 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत बेस्ट बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालकाशी वाद घातला. त्यानंतर या प्रवाशाने बसचे स्टेअरिंग ओढले. अशा परिस्थितीत बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोठा अपघात घडला. त्यावेळी अनियंत्रित झालेल्या या बसने पादचाऱ्यांना चिरडले. तसेच काही वाहनांना देखील धडक दिली. या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.
https://x.com/ANI/status/1830465638068023301?s=19
त्या प्रवाशाला अटक
पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ठरलेल्या त्या मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, ही बेस्टची बस मुंबईतील भाटिया बाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात होती. त्यावेळी या बस मधील एका मद्यधुंद प्रवाशाने लालबाग परिसरात चालकाशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर हा मद्यधुंद प्रवासी बस चालकाजवळ गेला आणि त्याने या बसचे स्टेअरिंग ओढले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी या बसने रस्त्यावरील लोक आणि वाहनांना धडक दिली. या अपघातात 9 जण जखमी झाले. त्यांना पोलिसांनी मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या 9 जखमींपैकी 2 महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
दरम्यान, या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. या अपघाताची कसून चौकशी करून दोषी व्यक्तीला तत्काळ कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. “मुंबईत बेस्ट प्रशासनाच्या 66 क्रमांकाच्या बसमध्ये लालबाग परिसरात एका मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी हुज्जत घालून बसच्या स्टेअरिंगला हात घातल्याने अपघात होऊन काही पादचारी तथा वाहनचालक जखमी झाल्याची घटना घडली. हा अतिशय दुर्दैवी व दुःखद प्रकार आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरू असून ते सुखरूप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना,” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.