जोहान्सबर्ग, 17 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुल हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर आफ्रिकेच्या संघाचे एडन मार्करम नेतृत्व करीत आहे. तत्पूर्वी, नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने शेवटचा सामना जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली होती.
दरम्यान, आजच्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मालिकेत भारताच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात भारताकडून साई सुदर्शन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. साई सुदर्शन हा आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाकडून खेळतो. तसेच संजू सॅमसनला देखील या सामन्यात संधी मिळाली आहे. याशिवाय, अक्षर पटेल या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1736299518256374180?s=19
तर, आफ्रिकेने या मालिकेसाठी टेंबा बावुमा, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघात देखील बदल करण्यात आले आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर या सामन्यातून आफ्रिकेच्या संघात पदार्पण करणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या प्रमुख वेगवान गोलदाजांची अनुपस्थिती जाणवण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/BCCI/status/1736288944109851118?s=19
जोहान्सबर्गमधील न्यू वांडरर्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक अशी मानली जाते. याठिकाणी नेहमी मोठ्या धावसंख्येचे सामने होतात. या मैदानावर मागील 4 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये पहिल्या डावात 300 पेक्षा जास्त धावसंख्या झाली आहे. तसेच या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघाची फलंदाजी पाहता आजच्या सामन्यात देखील मोठी धावसंख्या होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
https://twitter.com/BCCI/status/1736290629842620478?s=19
या सामन्यातील भारतीय संघ:-
केएल राहुल (यष्टीरक्षक आणि कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.
या सामन्यातील दक्षिण आफ्रिका संघ:-
एडेन मार्करम (कर्णधार), रिजा हेंड्रिक्स, टोनी डी जॉरजी, रसी वान डर डुसेन, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, वियान मुल्डर, नांद्रे बर्गर, केशव महाराज आणि तबरेज शम्सी.