दुसऱ्या टी-20 सामन्यात आफ्रिकेचा भारतावर 5 गडी राखून विजय

गकेबरहा, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 5 गडी राखून विजय मिळवला. गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने 19.3 षटकांत 7 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. तेंव्हा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यानंतर आफ्रिकेने 13.5 षटकात 154 धावा करत हा सामना जिंकला. याबरोबरच दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांच्या या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आफ्रिकेच्या तबरेझ शम्सी याला या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने या सामन्यात 4 षटकांत केवळ 18 धावा देत 1 विकेट घेतली होती.

https://twitter.com/BCCI/status/1734653650172309572?s=19

तत्पूर्वी या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची खराब सुरूवात झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे दोघे खाते न उघडताच बाद केले. त्यानंतर तिलक वर्मा 29 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग या दोघांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 56 आणि रिंकू सिंगने 39 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे भारताला 180 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने 3 विकेट घेतल्या. तर मार्को जॅनसेन, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि एडन मार्करन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.



त्यानंतर 152 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या खेळाडूंनी स्फोटक फलंदाजी करीत भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. यामध्ये आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्सने 27 चेंडूत सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला ह्या सामन्यात विजय मिळवणे सोपे झाले. त्यानंतर कर्णधार एडन मार्करामने 17 चेंडूत 30 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 14 आणि अँडिले फेहलुकवायोने नाबाद 10 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताकडून मुकेश कुमारने 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दरम्यान, 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील डर्बनमधील पहिला सामना पावसाने वाहून गेला होता. त्यानंतर आजचा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. त्यामुळे या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथील सामना भारतीय संघाला जिंकावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *