फलटण, 24 फेब्रुवारी: फलटण तालुक्यातील निंभोरे गावामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. मात्र, सद्यस्थितीत समाज मंदिराची जागा अतिशय कमी असल्याने विविध गैरसोयी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, ॲड. कांचनकन्होजाताई खरात यांनी निंभोरे येथे दोन ते दहा एकर जमीन संपादित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी उभारण्याची तसेच या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस के कुंभार यांना पत्र लिहिले होते.
मागणीला यश मिळाले
त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून, गटविकास अधिकाऱ्यांनी निंभोरे गावच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यासाठीही प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ॲड. कांचनकन्होजाताई खरात यांचे पत्र –
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दि. 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. तेंव्हा महाराष्ट्रातील काही माननीय पँथरांनी मुंबई वरून माघारी जाताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आप-आपल्या बरोबर घेऊन गेले होते. ती ठिकाणे म्हणजेच अमरावती, हातकलंगले, मुंबई, लातूर, सोलापुर तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील निंभोरे इत्यादी होती. ठिकाणी या अस्थीकलशांची स्थापना त्या-त्या ठिकाणच्या सर्व मंडळीनी एकत्र येऊन केली होती. त्यातील एक म्हणजेच निंभोरे गावचे भिम सैनिक होय. या ठिकाणी कमी जागेत बारीक असे समाज मंदिरात अस्थी कलशाची स्थापना केलेली आहे.
वाढलेली लोकसंख्या व जागेची कमी यामुळे हजारोंच्या संख्येने येणारे भिम सैनिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनुयायी अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी येत आसतात. त्यांना उभे राहण्यासाठी ही पुरेशी जागा नाही तसेच गाड्या पर्कीगसाठी जागा नसल्याने भिम अनुयायांची गैर सोय मोठ्या प्रमाणात होते. म्हणून वरील सर्व मान्यवरांना विनंती की निंभोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असने म्हणजे आपल्या फलटण तसेच सातारा जिल्ह्याचे भाग्यच होय. त्यामुळे येत्या 3 मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फलटण तालुक्यातील निंभोरे या ठिकाणी किमान 2 ते 10 एकर जमीन सरकारने संपादित करावी.
त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे भव्य दिव्य स्मारक व अस्थी कलश स्थापन करण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन पट सांगणारे श्री डी कलाकृती, प्रोजेक्टर व्दारे माहिती पट, संग्रहालय, मोठे ग्रंथालय, मोठा सभा मंडप, स्वच्छ पिण्याचे पाणी, पार्किंग इत्यादी सोयींयुक्त मोठी इमारत ज्यातून या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाबद्दल प्रेरणा घेऊन जाईल, अशी प्रेरणा भूमी आणि पर्यटन स्थळ करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील चारही कॅबिनेट मंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील आमदार यांनी विधान सभेत लक्षवेधी सुचना, तारांकित किंवा अतारांकीत प्रश्न उपस्थित करून भरघोस निधीची तरतुद करण्यास भाग पाडावे. मंजुर केलेल्या निधीतून तात्काळ फलटण तालुक्यातील निंभोरे येथे डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणा भुमी उभारण्यात यावी, अशी मागणी ॲड. कांचनकन्होजाताई खरात यांनी पत्रातून केली होती.