बारामती, 25 एप्रिलः बारामती तालुक्यातील जराड वाडी येथे 14 एप्रिल 2022 रोजी दिवसा ढवळ्या घरफोडीची घटना घडली. या घरफोडीत 4 लाख 96 हजार किमतीचे 10 तोळे सोने लंपास केली. या घरफोडीची तक्रार नवनाथ पंढरीनाथ जराड यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून भादवि कलम 454, 380 नुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सदर तपासाला 22 एप्रिल 2022 रोजी मोठे यश आले. या गुन्ह्यात संशयित आरोपी सोमनाथ ऊर्फ सोन्या तात्या काळे (वय 22, रा. नांदगाव, तालुका कर्जत जि. अहमदनगर), विधी संघर्शीत बालक (वय 17, रा. शेरी खुर्द, तालुका आष्टी जि. बीड) यांना अटक करण्यात आली.
सदर गुन्ह्यात संशयित आरोपी सोमनाथ ऊर्फ सोन्या काळे याला अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील नांदगाव येथून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरलेल्या 10 तोळे सोने हस्तगत करण्यात आले. सदर कामगिरीमुळे सर्व स्तरातून पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
सदर कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगले, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगुटे, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, रणजीत मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, पोलीस नाईक सदाशिव बंडगर यांच्या पथकाने केले. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगुटे हे करीत आहे.