बारामती, 24 मेः बारामती नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्सूनपूर्व कामे हाती घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. नाले, शहरासह परिसरातील ओढे, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता मोहीम अद्यापही राबवली गेलेली नाही. यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने रस्त्याचे केलेले खोद कामांचे डांबरीकरण व दुरुस्तीकरण अजूनही केले नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले दिसताहेत.
तसेच सांडपाणी, ड्रेनेज लाईन, स्वच्छता मोहीम नगरपरिषदेने अजूनही हातात घेतलेली नाही. त्यामुळे मलयुक्त, गाळयुक्त पाणी हे सकल भागात, झोपडपट्टी भागात शिरणार असून यामुळे झोपडपट्टीमध्ये राहणारे, सकल भागात राहणारे नागरिक सध्या नरक यातना भोगताहेत. शहरामधील तीन हत्ती चौकातील सदोष नवीन पुलामुळे नगरपालिका परिसरात पाणी साचणार असल्याचे जाणकारांकडून मत व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे रस्ते खड्डेमय झाले असून त्याच्या दागदुजीकडे लक्ष नसल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन प्रशासकीय इमारत ऐन पावसाळ्यात गळत असून कर्मचाऱ्यांचे व नागरिकांच्या हाल होत आहे. याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत केलेली नाही. त्यामुळे या पावसाळ्यात जुनी व महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होण्याची शक्यता कर्मचारी व अधिकारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे बारामती नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग मान्सूनपूर्व कामाकडे पाहणार का? असा प्रश्न बारामती नागरिक विचारत आहेत.
One Comment on “मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; बारामती पाण्यात बुडणार?”