गणेश उत्सवासाठी यंदा कोकणात एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार

मुंबई, 06 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात ज्यादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार, यंदा गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार आहेत. याची माहिती एसटी महामंडळाने एका निवेदनातून दिली आहे. राज्यात यंदा 07 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर, गणपती उत्सवासाठी यंदा 02 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

https://x.com/msrtcofficial/status/1818630175439175991?s=19

यंदा ज्यादा बसेसची संख्या वाढली

या जादा बसेस 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी गणपतीसाठी कोकणात 3500 ज्यादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. परंतु, यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. या बसेस मध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.

एसटी महामंडळाचे निवेदन

दरम्यान, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा आणि कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी http://npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation या ॲपमधून करता येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने या निवेदनातून दिली आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरूस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *