मुंबई, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा मुंबईतील कांदिवली परिसरात भीषण अपघात झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास पोईसर मेट्रो स्टेशनजवळ घडली. त्यावेळी भरधाव वेगाने असलेल्या उर्मिला कोठारे यांच्या कारने रस्त्याच्या मुंबईतील पोईसर मेट्रो स्टेशनखाली काम करत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
https://x.com/ANI/status/1872983605607326092?t=1lK6Rd_X4ZUFhoi9mnPviQ&s=19
अभिनेत्री अपघातात जखमी
दरम्यान, या अपघातग्रस्त कारमध्ये मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे होत्या. या अपघातात उर्मिला कोठारे देखील किरकोळ जखमी झाल्या असून कार चालकही जखमी झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, गाडीचा वेग अत्यंत जास्त होता आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे आणि प्रत्यक्षदर्शींशी चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातानंतर उर्मिला कोठारे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक चित्रपट आणि मालिकांत काम केले
दरम्यान, उर्मिला कोठारे या मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरूवात 2006 साली शुभमंगल सावधान या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही आपली अभिनय क्षमता सिद्ध केली. मराठी मालिकांमध्येही त्यांचा मोठा सहभाग असून त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे उर्मिला कोठारे या लोकप्रिय ठरल्या आहेत. याशिवाय उर्मिला कोठारे या प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पत्नी आहेत. त्या अनेक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. नृत्य आणि अभिनय क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.