चेन्नई, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) अभिनेते आणि डीएमडीके पक्षाचे प्रमुख विजयकांत यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चेन्नई मधील एमआयओटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. मात्र या उपचारादरम्यान त्यांचे काल रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
https://x.com/ANI/status/1740218328646660360?s=20
विजयकांत यांच्या निधनाची बातमी आल्याने त्यांचे चाहते, कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयाने दिलेल्या अहवालात विजयकांत यांचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे विजयकांत यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांचे काल निधन झाले. तत्पूर्वी विजयकांत हे काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांची पत्नी प्रेमलता यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाची जबाबदारी स्वीकारली होती.
अभिनेते ते राजकारणी प्रवास
दरम्यान, राजकारणात येण्यापूर्वी विजयकांत यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात 150 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर विजयकांत हे एक यशस्वी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक देखील होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विजयकांत यांनी 2005 मध्ये देसी मुरपोक्कू द्रविड मुनेत्र कळघम (डीएमडीके) हा पक्ष स्थापन केला. त्यानंतर 2011 ते 2016 या काळात ते तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यांना कॅप्टन नावाने देखील ओळखले जात होते.
अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली!
https://twitter.com/narendramodi/status/1740228820332896483?s=19
विजयकांत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे. “विजयकांत जी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. तमिळ चित्रपट उद्योगातील एक दिग्गज, त्याच्या करिष्माई अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली. एक राजकीय नेता म्हणून, ते सार्वजनिक सेवेसाठी अत्यंत वचनबद्ध होते, ज्यामुळे तामिळनाडूच्या राजकीय परिदृश्यावर कायमचा प्रभाव पडला. त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढणे कठीण आहे. ते एक जवळचे मित्र होते. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबीयांसह, चाहते आणि असंख्य अनुयायांसह आहेत. ओम शांती.” असे नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://x.com/ANI/status/1740233581262475434?s=20
विजयकांत यांच्या निधनाबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. “डीएमडीकेचे संस्थापक, थिरू विजयकांत जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. चित्रपट आणि राजकारणातील त्यांच्या योगदानाने लाखो लोकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. माझे या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी मनापासून संवेदना.” असे त्यांनी यात म्हटले आहे.