हैदराबाद, 13 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुष्पा 2: द रुल या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याला आज (दि.13) दुपारी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला कनिष्ठ न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निर्णयाविरोधात अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात आव्हान देत जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे याप्रकरणात त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
https://x.com/ANI/status/1867566055100715044?t=FUEHQ6edU2pcL86uZsQOAg&s=19
50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
यावेळी हायकोर्टाचे एकल न्यायाधीश न्यायमूर्ती जुव्वादी श्रीदेवी यांनी सांगितले की, “प्रथमदर्शनी अल्लू अर्जुनला या घटनेसाठी जबाबदार धरता येणार नाही. कारण, तो आवश्यक परवानगी घेऊनच चित्रपटाच्या प्रीमियरला गेला होता. प्रीमियरसाठी गेल्यास अशी अनुचित घटना घडू शकते,” त्याचबरोबर अर्जुनला ही घटना होणार हे माहीत असल्याचा राज्य सरकारचा युक्तिवादही हायकोर्टाने फेटाळला. तसेच तो अभिनेता असल्यामुळे त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. या जगाचे नागरिक म्हणून त्यांनाही जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असेही कोर्टाने यावेळी म्हटले आहे. यानंतर हायकोर्टाने अल्लू अर्जुनला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे आता अल्लू अर्जुनची तुरूंगातून सुटका होणार आहे.
चित्रपटाच्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी
गेल्या 4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन हा संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनला आपल्या चाहत्यांसोबत हा चित्रपट पाहायचा होता. मात्र त्याचवेळी आपल्या आवडत्या सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक याठिकाणी पोहोचले होते. यादरम्यान तेथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यात एका 35 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. तसेच यामध्ये त्या महिलेचा आठ वर्षीय मुलगा देखील जखमी झाला होता. यानंतर अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरूद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता.