पुणे, 29 फेब्रुवारीः एका डिलिव्हरी बॉयला रात्रीच्या अंधारात शिवीगाळ करून जबरदस्तीने त्याच्याकडून हार्ड डिस्क, चेक बुक आणि 2 हजार रुपये चोरून नेल्याप्रकरणी 8 जणांच्या विरोधात मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना 26 जानेवारी 2024 रोजी पुणे शहरातील हडपसर परिसरातील रामटेकडी येथील आण्णाभाऊ साठे वाचनालय येथे घडली होती. याप्रकरणी, वानवडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात कलम 392, 504, 506, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) (3) सह 135 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिघांना अटक, दोघे फरार
याप्रकरणी, पोलिसांनी करण शिंदे (19), मुज्जमिल शेख (18), ओम भैनवाल (18) या तिघांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. तर शुभम गायकवाड (24) आणि विशाल जाधव हे दोघे फरार झाले आहेत. शुभम गायकवाड या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर या सध्या त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
अशी घडली घटना
दरम्यान, 26 जानेवारी 2024 रोजी रात्री हा डिलिव्हरी बॉय एका ग्राहकाची ऑर्डर देण्यासाठी दुचाकी गाडीवरुन रामटेकडी येथील डॉ. डब्ल्युआर. खान ऊर्दू शाळेच्या मागील गल्लीत आण्णाभाऊ साठे वाचनालय याठिकाणी आला होता. त्यावेळी रात्रीच्या अंधारात तीन ते चार जणांनी अचानकपणे आडवे येवुन त्याला शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने त्याची सॅक चेक करून सॅक मधील हार्ड डिस्क, चेक बुक आणि 2 हजार रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी 8 जणांच्या विरोधात मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 2024 या चालू वर्षात मकोका अंतर्गत केलेली ही 14 वी कारवाई आहे.
गुन्ह्यातील प्रमुख आरोपी फरार!
दाखल गुन्ह्यातील शुभम राघु गायकवाड याने वेळोवेळी त्याचे साथीदार बदलुन त्यामध्ये त्याने अल्पवयीन मुलांना देखील सोबत घेऊन अनेक प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. यामध्ये त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमविणे, इतरांचे जीवित व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे, प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात समील होणे, बेकायदेशीर गृह-अतिक्रमण करून विस्तव किंवा स्फोटक पदार्थाने नुकसान करणे, दरोडा टाकणे इ. प्रकारचे गुन्हे करून सदर भागातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्ये करून स्वतःचे अस्तित्व लपविण्यासाठी वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा पेहराव करून अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.