मुंबई, 20 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत ‘व्होट जिहाद’ या शब्दाचा वापर केला होता. या विरोधात वर्षा गायकवाड यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
https://x.com/ANI/status/1847639563017322567?t=ziXYH0oTX6Vw0sKWOEwplg&s=19
वर्षा गायकवाड यांचे पत्र…
राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते व्होट जिहाद असा शब्दप्रयोग करून एका विशिष्ट धर्माचा अपमान करत आहेत. निवडणुकीत कोणी कोणाला मतदान करायचे हा त्या मतदाराचा अधिकार आहे. जर एखाद्या मतदाराने किंवा काही भागातील बहुसंख्य मतदारांनी मतदान केले असेल तर त्याला व्होट जिहाद म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने मतदाराला दिलेल्या हक्क व अधिकाराचे हे उल्लंघन आहे, असे वर्षा गायकवाड यांनी या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका पत्रकार परिषदतच व्होट जिहाद सारखे विधाने केल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असे आपण जाहीर केले होते. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत “धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होट जिहाद केला जात आहे.” असे विधान केले आहे, असे वर्षा गायकवाड यांनी यामध्ये सांगितले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते अशा पद्धतीने विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. संविधानाने त्यांना दिलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणत आहेत. अशा प्रकारे विधान करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. आशिष शेलार यांच्या विधानाची आपण गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी , अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी या पत्रातून केली आहे.