बारामती, 14 मेः बारामतीमधील जळोची भागात नुकतेच नवीन हॉटेल मातोश्री सुरु झाले आहे. या हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करीत असलेल्या गणेश प्रभाकर चव्हाण (रा.मालेगाव जि. नाशिक) याचा त्याच हॉटेलमधील दुसरा कामगार विकास दीपक सिंग (वय- 23, मूळ रा. चंदिगड पंजाब, सध्या रा. बारामती) याने हॉटेलमधील कामाच्या किरकोळ कारणावरून 13 मे 2022 रोजी 2.15 च्या सुमारास खून केला. या खूनामुळे परिसरात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक रंजीत मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, नाईट राउंडचे पोलीस अधिकारी लेंडवे आणि त्यांच्या सोबतचे अंमलदारांना आरोपीला तात्काळ पकडण्या बाबत योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून स्वतः आरोपीचा शोध घेणे कामी मोहीम हाती घेतली. एक तासाच्या आत चंदिगड, पंजाब या मूळ गावी पळून निघालेल्या आरोपीला बारामतीमधील माळावरची देवी येथून ताब्यात घेतले.
दरम्यान, मातोश्री हॉटेलच्या आवारामध्ये आरोपीने मयत आचारी गणेश चव्हाण याच्या अंगावर चेहऱ्यावर चाकूने सपासप वार करून ठार मारले. या घटनेनंतर संशयित आरोपी विकास सिंग याने आपल्या मूळ गावी पंजाबला जाण्यासाठी धूम ठोकली. प्रकरणाची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांना तपासाचे चक्र वेगाने फिरवून संशयित आरोपीला एका तासात ताब्यात घेत मुसक्या आवळल्या. सदर खून प्रकरणात बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 283 /22 भादवि कलम 302.323,504. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभाग पुणे ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, बारामती तालुका पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पो.स.ई. लेंडवे, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरूटे, रणजीत मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, सहाय्यक फौजदार भागवत या सर्वांनी मिळून केली आहे.
यापुढे आपल्या हॉटेलमध्ये कामासाठी ठेवलेले सर्व कामगारांची माहिती बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे द्यावी, तसेच स्वतःकडे त्यांची एक फाईल बनवून ठेवावी. तसेच सर्व कामगारांचे व्हेरिफिकेशन करून ते गुन्हेगार नाहीत ना, याची खात्री करूनच त्यांना कामावर ठेवावे. असे न केल्यास भादवि कलम 188 प्रमाणे हॉटेल चालकांवर कायदेशीर गुन्हे नोंद केले जातील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सर्व हॉटेल मालक यांना आवाहन केले आहे.