पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीच्या आजोबाला अटक!

पुणे, 25 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. पोर्शे कार अपघातप्रकरणी आता या अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे. आरोपीच्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि त्याला कोंडून ठेवण्याच्या आरोपातून त्याच्या आजोबाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीच्या आजोबावर आयपीसीच्या कलम 365 आणि 368 अंतर्गत स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1794228900413034648?s=19

आरोपीच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी

तत्पूर्वी, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला सध्या बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तसेच या आरोपीच्या वडिलांना कोर्टाने 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुलगा अल्पवयीन असताना तसेच त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना देखील त्याच्या हातात कार दिल्याप्रकरणी आरोपीच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या त्याचे वडील तुरूंगात आहेत. यासोबतच या अपघाताच्या आधी सदर अल्पवयीन आरोपीला दारू सर्व्ह केल्याप्रकरणी संबंधित पब मॅनेजमेंट मधील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना देखील कोर्टाने 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या आजोबाला अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

तर या पोर्शे कार अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना काल निलंबित करण्यात आले आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांनी या पोर्शे कार अपघाताची माहिती पोलीस स्टेशनच्या वायरलेस कंट्रोल रूमला दिली नाही. तसेच त्यांनी या अपघाताची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *