पुणे, 22 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी, विशाल अग्रवाल यांना काल पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असून, ते कल्याणी नगर मधील अपघाताला कारणीभूत असलेल्या वेदांत अग्रवाल याचे वडील आहेत.
https://twitter.com/ANI/status/1793229564245905885?s=19
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1793212085192589581?s=19
शाईफेक करण्याचा प्रयत्न
आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या हातात विना नंबर प्लेटची कार दिल्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. त्यानंतर त्यांना काल सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी, विशाल अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालयातून कोर्टात नेत असताना त्यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. शाईफेक करण्याचा प्रयत्न करणारे वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान विशाल अग्रवाल यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र, कोर्टाने याप्रकरणी विशाल अग्रवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1792910857019511223?s=19
तिघांना पोलीस कोठडी
तत्पूर्वी, शनिवारी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका 17 वर्षीय मुलाने चालविलेल्या वेगवान पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कोर्टाने काही तासांतच जामीन दिला. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पब मॅनेजमेंट टीममधील व्यक्तींचा समावेश आहे. याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना कोर्टाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला दारू सर्व्ह केल्याप्रकरणी संबंधित पब मॅनेजमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.