बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश

मुंबई, 13 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज (दि.13) मुंबईतील कोर्टासमोर हजर करण्यात आले. यामधील एका आरोपीची कोर्टाने 21 ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत रवानगी केली आहे. तर कोर्टाने दुसऱ्या आरोपीची ओसीफिकेशन चाचणी करून त्याला कोर्टात पुन्हा हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील दुसरा आरोपी धर्मराज कश्यपने कोर्टासमोर आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्याची ओसीफिकेशन चाचणी करण्यात येणार आहे.

https://x.com/AHindinews/status/1845429203849838657?t=iILYfTCVbBOO3pco6mEv3w&s=19

दुसऱ्या आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश

दरम्यान, ओसीफिकेशन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. ज्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या हाडांच्या संमिश्रणाच्या डिग्रीचे विश्लेषण करून त्याच्या वयाचा अंदाज लावता येतो. एखाद्याचे वय ठरवण्याची ही एक लोकप्रिय पद्धत आहे. त्यामुळे आरोपी धर्मराज कश्यप हा खरोखरच अल्पवयीन आहे की नाही? हे कळणार आहे. अशा परिस्थितीत कोर्टाने आरोपी धर्मराज कश्यप याची ही चाचणी केल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या चाचणीतून काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी गुरमेल सिंग याला कोर्टाने 21 ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

https://x.com/AHindinews/status/1845424558507163875?t=OL87WaupKukSztOTywradg&s=19

चौथ्या आरोपीची ही ओळख पटली

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात 4 आरोपींचा सहभाग असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ही घटना घडल्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपींना काल अटक करण्यात आली आहे. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तर दोन आरोपी सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके अनेक राज्यांत रवाना करण्यात आली आहे. शिवकुमार गौतम असे या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. तर या हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली आहे. मोहम्मद जीशान अख्तर असे चौथ्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

https://x.com/AHindinews/status/1845318087354220907?t=6mRpD_MYicPp_izcEI9p4w&s=19

या कलमांनुसार गुन्हा दाखल

तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी भारतीय न्यायिक संहिता (बीएनएस) च्या कलम 103(1), 109, 125 आणि 3(5) सोबतच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3, 25, 5 आणि 27 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 आणि 137 नुसार मुंबईतील निर्मल नगर पोलिस ठाण्यात 589/2024 या नोंदणी क्रमांकासह गुन्हा नोंदवण्यात आला आहे, याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाने दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *