कल्याणी नगर अपघातप्रकरणी आरोपीला जामीन; रवींद्र धंगेकर यांनी केली कठोर कारवाईची मागणी

पुणे, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्श कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी (दि.18) घडली होती. या घटनेत दुचाकीवरील तरूण-तरूणीचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या अपघात प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान हा अल्पवयीन मुलगा एका बिल्डरचा मुलगा असून, त्याला कोर्टाने रविवारी जामीन मंजूर केला आहे. वेदांत अग्रवाल असे त्याचे नाव आहे. तो प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा हा मुलगा आहे. या अपघतावेळी हा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान, या आरोपीला इतक्या लवकर जामीन मिळाल्याने समाज माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे.

https://twitter.com/DhangekarINC/status/1792475715331670180?s=19

धंगेकरांचे ठिय्या आंदोलन

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज कल्याणी नगर भागात झालेल्या अपघातानंतर संबंधित गुन्हेगाराला मिळालेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या विरोधात तसेच या पब मालक आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात येरवडा पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच या आरोपीला इतक्या लवकर जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ रवींद्र धंगेकर यांनी ट्विट केले आहे. कल्याणी नगर मधील या अपघातातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली. या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे. अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी या ट्विट मधून केली आहे.

पब मालकांवर अटकेची कारवाई करावी

तसेच अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब, Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायमस्वरूपी बंद केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सोबतच येरवडा पोलीस स्टेशन मधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले. पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला. या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी या ट्विटमधून केली आहे.

दोघांचा जागीच मृत्यू

ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झालेला आहे. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

जामीनावर प्रश्नचिन्ह उपस्थित

सुरूवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला. तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हीट अँण्ड रन केसप्रमाणे ड्रायव्हरला ही उभे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरूणीची बाजू मांडली. गाडी विशाल आग्रवालचा मुलगाच चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हीडीओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले. येथे कारवाईचा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी आँफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी मुला विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. बर्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून, आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स Bailable असल्यामुळे वेदांतचा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले, असे रवींद्र धंगेकर यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *