देशाचा अर्थसंकल्प सादर, 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही

दिल्ली, 23 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनवरही दिलासा दिला आहे, जो सध्याच्या 50,000 रुपयांवरून 75,000 रुपये करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जुन्या कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. तसेच नवीन कर प्रणाली अंतर्गत, कुटुंब निवृत्ती वेतनावरील कपात पेन्शनधारकांना 15,000 वरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पामधून देण्यात आला आहे.

https://x.com/AHindinews/status/1815643826247348229?s=19

https://x.com/AHindinews/status/1815644166342525024

नवीन कर प्रणालीतील कररचना खालीलप्रमाणे (वार्षिक उत्पन्न)

0 ते 3 लाख रुपये उत्पन्न – कोणताही कर नाही
3 ते 7 लाख रुपये उत्पन्न – 5 टक्के कर
7 ते 10 लाख रुपये उत्पन्न – 10 टक्के कर
10 ते 12 लाख रुपये उत्पन्न – 15 टक्के कर
12 ते 15 लाख रुपये उत्पन्न – 20 टक्के कर
15 लाख आणि त्याहून अधिक रुपये उत्पन्न – 30 टक्के कर

कर रचनेत सुधारणा

या सर्वसाधारण अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीतील वैयक्तिक आयकर दरांमध्ये सुधारणा केली आहे. या नवीन कर प्रणालीनुसार 3 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. त्याचबरोबर 3 ते 7 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जाईल. तसेच आयकरदात्यांना 7 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर, 10 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के, 12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागेल.

जुनी कर रचना अशी होती

तर यापूर्वीच्या कर प्रणालीत 3 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागत नव्हता. तर 3 ते 6 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर, 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर, 9 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के कर, 12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *