पुणे, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर परिसरात शनिवार रात्री झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू होता. या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. पुण्यातील घटना अस्वस्थ करणारी आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आतापर्यंत काय घडले आणि काय कारवाई केली जाईल, याचा आढावा या बैठकीत घेतला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1792925229699703118?s=19
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाल न्याय मंडळाच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अहवाल ज्युवेनाईल जस्टीस बोर्डकडे सादर केला होता. त्यामध्ये स्पष्टपणे 304 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्यांचा असल्यामुळे ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने आरोपीला जामीन मंजूर केला. मात्र, निर्भया हत्याकांडनंतर यामध्ये बदल करण्यात आले. त्यानुसार 16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना मोठ्या गुन्ह्यांत प्रौढ म्हणून ट्रीट केले जावे, अशी बाजू पोलिसांनी कोर्टासमोर मांडली होती. पण दुर्दैवाने बाल न्याय मंडळाने याप्रकरणी वेगळी भूमिका घेतली. अशाप्रकारच्या प्रकरणात पोलिसांनी जिथे सगळे पुरावे दिले आहेत. कोणालाही दारू पिऊन विना नंबर प्लेटची गाडी चालवून कोणाला मारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या प्रकरणात पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जिथंपर्यंत जाता येईल तिथंपर्यंत जाण्याची पोलिसांची तयारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1792910857019511223?s=19
तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना आज पोलिसांनी अटक केली आहे. मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याच्या हातात विना नंबर प्लेटची कार दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या मुलाच्या वडिलांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तसेच हा मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला दारू सर्व्ह केल्यामुळे याप्रकरणात संबंधित पब मधील तिघांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरोपीला जामीन मिळाल्याने समाज माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता याप्रकरणी आरोपीला सज्ञान समजून सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यासाठी पुणे पोलीस सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत.