शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

जळगाव, 03 मे: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज जळगाव जिल्ह्यात घडली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून भुसावळकडे चालला होता. तेंव्हा किनगाव जवळ त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर धडकल्या. सुदैवाने या घटनेत कोणालाही कसलीही दुखापत झाली नाही.

असा झाला अपघात

शरद पवार हे आज प्रचारदौरा आटपून भुसावळकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा वेग स्पीड ब्रेकर आल्यामुळे कमी झाला. परिणामी वेगाचा अंदाज आला नसल्यामुळे शरद पवारांच्या ताफ्यातील मागील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातामुळे ह्या दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत होती. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

शरद पवार आज जळगावच्या दौऱ्यावर

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे जाहीर सभा पार पडली. ही सभा आटपून जात असताना शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *