पुणे, 11 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे 50 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. अशा अनधिकृत शाळांची यादी पुणे जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे या शाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा बोगस शाळांमुळे विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर, पालकांनी आवश्यक ती खात्री करूनच आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तपास केला होता. त्यामधून ही माहिती समोर आली आहे.
शाळांवर कारवाई होणार का?
यातील बऱ्याच शाळा विना परवानगी सुरू आहेत. तर काही शाळांना एका ठिकाणी परवानगी होती, परंतु, ती शाळा दुसऱ्याच ठिकाणी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधील काही शाळांना पहिली ते पाचवी पर्यंतच परवानगी होती, परंतु तरी देखील त्या शाळेत पुढील वर्ग भरविण्यात येत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सध्या समाज माध्यमातून केली जात आहे. तर येत्या काही काळात अशा शाळांवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विद्यार्थी-पालकांच्या काळजीत वाढ!
दरम्यान, नवे शैक्षणिक वर्ष गेल्या महिन्यापासूनच सुरू झाले आहे. त्यामुळे जर अशा अनधिकृत शाळांवर कारवाई झाली तर या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची काळजी वाढली आहे. जिल्हा परिषदेला पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे 50 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह, दौंड, पुरंदर, खेड तालुक्यातील शाळा विनापरवानगी सुरू असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, पुणे जिल्ह्यातील इतरही ठिकाणी अनधिकृत शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.