पुणे, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर परिसरात आज मध्यरात्री तीनच्या सुमारास कार अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित कार चालकावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेला हा 17 वर्षीय तरूण असून तो पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या या कारवर नंबर प्लेट नव्हती. तो आपल्या पोर्शे गाडीतून पार्टी आटपून येत होता. त्यावेळी वेगात असलेल्या त्याच्या पोर्शे कारने एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरूण-तरूणीचा जागीच मृत्यू झाला.
https://x.com/ANI/status/1792090496627839095
कारची इतर वाहनांना देखील धडक
त्यानंतर संतापलेल्या जमावाने पोर्शे कार चालवणाऱ्या या तरूणाला मारहाण केली. पोर्शे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी वेगात असलेल्या या कारने या दुचाकीसह इतर वाहनांना देखील धडक दिली. हा कारचालक अल्पवयीन असून तो 17 वर्षांचा आहे. या अपघातानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातावेळी हा अल्पवयीन तरूण नंबर प्लेट नसलेली पोर्शे कार भरधाव चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात आज मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दुचाकीवर असलेल्या अनिस अवलिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचा मित्र एकीब रमजान मुल्ला यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या कार चालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या अपघातानंतर याठिकाणी जमलेल्या लोकांनी संबंधित कार चालकाला मारहाण केली. या अपघाताचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर या अपघाताचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.