पुणे, 12 जून: (विश्वजीत खाटमोडे) मोलकरणीचे काम करणाऱ्या एका महिलेला घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील येथील उच्चभ्रू सोसायटी मधील एका घरातून 13 लाख 36 हजार 800 रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करून पळून गेली होती. सायली कार्वे (22) असे अटक केलेल्या या महिलेचे नाव असून, तिच्याकडून 13 लाख 11 हजार 800 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने येरवडा पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी, येरवडा पोलीस ठाण्यात कलम 381 अन्वये या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 लाखांहून अधिक किमतीचे दागिने जप्त
तसेच या महिलेने आंबेगाव परिसरातील एका घरात देखील चोरी केल्याचे कबूल केले आहे. या गुन्ह्यात तिच्याकडून पोलिसांनी 4 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. अशाप्रकारे या आरोपी महिलेकडून 2 गुन्ह्यांत एकूण 17 लाख 11 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करीत असताना येरवडा पोलिसांना ही आरोपी महिला तिच्या सातारा जिल्ह्यातील किन्हई मूळ गावात असल्याची माहिती मिळाली होती.
आंबेगाव परिसरात देखील चोरी
या माहितीच्या आधारे पोलिसांनी किन्हई गावात जाऊन या महिलेला अटक केली. यावेळी ह्या आरोपी महिलेने लहान मुलाचा सांभाळ करण्याचे काम मिळवून संबंधित घरात प्रवेश करून तेथील घरात चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. तसेच तिने आंबेगाव परिसरात देखील एका घरात लहान मुलाला सांभाळण्याचे काम मिळवून 4 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या येरवडा पोलीस करीत आहेत.