मिर्झापूर, 04 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे एका ट्रॅक्टरला ट्रकने पाठीमागून धडक दिली. या अपघातात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा ट्रॅक्टर भदोही जिल्ह्यातून बनारसला जात होता. त्यावेळी एका ट्रकने या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. मिर्झापूरच्या मिर्झा मुराद कांचवा बॉर्डरवरील जीटी रोडवर मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातावेळी सदर ट्रॅक्टरमध्ये 13 जण होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
https://x.com/AHindinews/status/1842021044187758877?t=X88SA1uY41Gb77FI8CwSXw&s=19
असा झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरवर बसलेले हे सर्व 13 जण भदोही जिल्ह्यात मजूर म्हणून काम करत होते. जे भदोही जिल्ह्यातून छताचे काम करून आपल्या घरी मिर्झा मुराद वाराणसीला जात होते. त्यादरम्यान त्यांच्या ट्रॅक्टरला एका ट्रकने मागून जोरदार धडक दिली. चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी, एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
https://x.com/PMOIndia/status/1842068628230811719?t=7HLPIA4mFSSWW19QK8kPOg&s=19
पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
दरम्यान, या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.