मुंबई, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी पिक विमा भरण्याची मुदत 31 जुलै 2024 रोजी समाप्त झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील एकूण 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. याबाबतची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्य सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील करोडो शेतकऱ्यांना होणार आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1818569191471169877?s=19
31 जुलैपर्यंत मुदत होती
या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी 18 जूनपासून प्रधानमंत्री पिक विमा भरण्यास सुरूवात झाली होती. पिक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा भरण्यासाठी सुरूवातीला 15 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्राने पिक विमा भरण्याची मुदत 31 जुलै 2024 पर्यंत वाढविली होती. या योजनेत राज्यातील शेतकरी बांधवांना भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या 14 पिकांसाठी पीक विमा भरता येणार होता.
एकूण विमा हप्ता 7959 कोटी
या योजनेसाठी एकूण विमा हप्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित झाला आहे. त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी, त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे. केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.