बारामती, 27 एप्रिलः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यामधील पश्चिम पट्ट्यामधील मुर्टी, मोरगाव, आंबी जोगवडी, उंबरवाडी, लोणी भापकर, मुढाळे, ढाकाळे, साहेबाची वाडी या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यावर्षीचा उन्हाळा भयंकरच जाणवत आहे. तरी मार्च, एप्रिल ह्या महिन्यामध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच शेतीच्या पाण्याची कमतरता भासत आहे.
गेले अनेक वर्षापासून या भागाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे या भागातील नागरिकांनी शेतीच्या पाण्याची कायमस्वरूपी पाणी मिळणे बाबत अनेक वेळा तोंडी व लेखी स्वरूपामध्ये मागणी केलेली आहे. या भागांमधून सध्या पुरंदर उपसा सिंचन योजना कार्यरत आहे. गेल्या सात-आठ महिन्यापासून येथील नागरिकांनी पैसे भरून सुद्धा पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी या भागाला सोडण्यात आलेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेले असून अधिकाऱ्यांच्या विरोधात येथील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याकडे स्वतः लक्ष द्यावे, असे बारामती पश्चिम पट्ट्यातील नागरिकांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना मागणी केली आहे.