दिल्ली, 09 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशात एमपॉक्सचा (मंकीपॉक्स) संशयित रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये त्यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा आणि एमपॉक्सच्या संशयित रूग्णांची चाचणी घेण्याचा तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एमपोक्स ही चिंतेची बाब घोषित केली आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने या पत्रात म्हटले आहे.
https://x.com/ANI/status/1833045411629851089?s=19
सतर्क राहण्याच्या सूचना
या पार्श्वभूमीवर, त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवली पाहिजे. तसेच त्याला सामोरे जाण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. यासंदर्भातील सर्व माहिती आरोग्य मंत्रालयाला देण्यात यावी. संशयित एमपॉक्स रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यासाठी अनेक प्रयोगशाळा नियुक्त केल्या आहेत, ज्याची माहिती सर्व राज्यांना देण्यात आली आहे. यासोबतच सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांमध्ये याबाबत अनावश्यक भीती पसरू नये यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे.
देशात एमपॉक्सची पुष्टी झालेली नाही
सध्याच्या उद्रेकात भारतात एमपॉक्स चे कोणतेही नवीन प्रकरण आढळून आलेले नाही. तसेच संशयित प्रकरणांमधील कोणत्याही नमुन्यात संसर्गाची पुष्टी झालेली नाही, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच मंत्रालय या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून यासंदर्भात सर्व राज्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी या पत्रातून दिल्या आहेत.
https://x.com/ANI/status/1832726785177329665?s=19
देशात एमपॉक्सचा संशयित रुग्ण
तत्पूर्वी, रविवारी (दि.08) भारतात एमपॉक्सचा संशयित रुग्ण आढळून आला होता. परदेशातून नुकत्याच भारतात परतलेल्या व्यक्तीमध्ये एमपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. त्या संशयित रुग्णावर रुग्णालयात विलगीकरणात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णाची प्रकृती ठीक असून, त्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची आरोग्य विभागाकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, हा व्यक्ती कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही.