बारामती, 30 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात एका विद्यार्थ्याची भरदिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे. बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात सोमवारी (दि.30) ही घटना घडली. या घटनेमुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी, पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केली. दरम्यान, ही हत्या कोणत्या कारणावरून झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
https://youtu.be/LZEb6mBpn2E?si=BNoMqX5M94Xgo3s3
https://youtu.be/TcEn4pEEU58?si=iy5Tll4c87AfDx1B
कॉलेजच्या आवारात हत्या
बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात आज भरदिवसा एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारधार शस्त्राने वार केले. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना विद्यार्थ्यांसमोरच घडली. या हल्ल्यानंतर जखमी विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त समजताच बारामती पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. तर या प्रकरणात अजून एका विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. ते दोघे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होते. या दोघांचा यापूर्वी काही कारणाने वाद झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वादातूनच ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचा तपास सध्या बारामती पोलीस करीत आहेत.
https://x.com/supriya_sule/status/1840656016314372157?t=402GwZZ4UX0i18wEa5Y2oA&s=19
सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका
दरम्यान, या घटनेवरून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “बारामती येथील एका महाविद्यालयात एका तरूणाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा व्यवस्थेचा आलेख दिवसेंदिवस ढासळत चाललेला असून गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. दिवसाढवळ्या कुणीही तलवार, कोयता, गावठी पिस्तुल घेऊन येतो आणि खून करतो अशी स्थिती आहे. गृहमंत्री महोदयांच्या अपयशामुळे महाराष्ट्रात सुरू झालेले हे गुंडाराज राज्याला अनेक वर्षे मागे घेऊन गेले, ही वस्तुस्थिती आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.