अवैधरित्या गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी बारामतीत एका व्यक्तीला अटक

बारामती, 21 जानेवारीः बारामती परिसरात अवैधरित्या गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी गावठी पीस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बारामती शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना एका व्यक्तीकडे गावठी बनावटीचा पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या व्यक्तीला बारामतीतून अटक केली.

पेट्रोलिंग करताना मिळाली होती माहिती

फरारी आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. हे पथक 10 जानेवारी रोजी फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी बारामती शहरात पेट्रोलिंग करत होते. तेंव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ यांना एका व्यक्तीकडे गावठी बनावटीचा पिस्टल असून, तो बारामतीच्या श्रीरामनगर येथील भिगवण रोडलगत कोणाची तरी वाट बघत थांबला असल्याची माहिती मिळाली.

ॲक्ट कलम 3 (25) अंतर्गत गुन्हा दाखल

या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणावरून सबंधित व्यक्तीला अटक केली. रोहित उर्फ बापू निकम असे या 31 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. तो बारामती येथील श्रीरामनगर येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात आर्म ॲक्ट कलम 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सध्या बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सध्या त्याची पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *