बैठकीत पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी मिरवणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रामुख्याने मिरवणुकीत कोणत्याही ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही, मिरवणुकीत मद्यपान करून सामील होणार नाही, मिरवणुकीत वाहतुकीस अडथळा होणार नाही आदी बाबींची दक्षता घेण्याचे सांगितले. यासह मिरवणूक ही शहराच्या मध्यभागातून जाते, यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी होणार नाही, याचे नियोजन करावे, अशी मागणी सामजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्याच बरोबर नगर परिषदेने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, महावितरणने जयंती दिवशी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणीही शांतता बैठकीत करण्यात आली. तसेच पोलीस ठाण्यातील संबंधित विभागांना या बाबतचा पत्र देण्यात येणार आहे.
सदर शांतता बैठकीत मिरवणूक वेळेत काढून 1 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता संपविण्याचे ठरविण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची साहित्य आणि विचार प्रत्येक घराघरात पोहोचवाव, असा सर्वांनी एकमताने निर्धार केला. सदर बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसांना मिरवणुकीच्या दिवशी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सदर शांतता बैठकी ही शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.