बारामती, 08 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे राज्यातील अनेक भागांत आता दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. राज्यात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणचे बंधारे व तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा तसेच अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे धरणांतून पाणी सोडण्याची मागणी बहुतांश भागांतील नागरिक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील पाणी व चारा टंचाई आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती व इंदापूर तालुक्यातील पाणी व चारा टंचाई आढावा बैठकीचे पंचायत समिती कार्यालय येथे आयोजन. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित…१/२ pic.twitter.com/ik14eVcrZp
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) April 7, 2024
या बैठकीचे आयोजन पंचायत समिती कार्यालय येथे करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक तेथे पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करावेत. तसेच पशुधनासाठी चारा, चाऱ्याचे क्षेत्र वाढावे यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संबंधित विभागांनी यासंदर्भातील नियोजन करून समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.