मुंबई, 13 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारची आज (दि.13) एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागाचे मंत्री उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी 149 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1823270700691394773?s=19
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात
1) मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाखो नागरिकांना लाभ होणार आहे.
2) विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.
3) डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येणार आहे.
4) यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील करण्यात आली आहे.
5) शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
6) सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुधारित 37 हजार कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.
7) नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्यात आला आहे.
8) सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार केले जाणार आहेत.