मुंबई, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेत्यांची सध्या बैठक सुरू आहे. ही बैठक अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी मंत्री उपस्थित आहेत.
https://twitter.com/ANI/status/1798602079222788509?s=19
राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी एकच जागा जिंकण्यात राष्ट्रवादीला यश आले. या निवडणुकीत राष्ट्रवादीने रायगड येथील जागा जिंकली. या जागेवर सुनील तटकरे यांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादीला बारामती, शिरूर आणि उस्मानाबादच्या जागेवर पराभव पत्करावा लागला आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. तर शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादीच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. तसेच उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केला होता.
लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राष्ट्रवादी पक्षात सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी पक्षाच्या आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेत्यांकडून केला जाण्याची शक्यता आहे. तसेच आता यापुढील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, ही बैठक कोणत्या कारणासाठी बोलावली आहे. यासंदर्भात अधिकृतपणे काहीच संगण्यात आलेले नाही.