नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीच्या अलीपूर भागात पेंट कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. तर या आगीच्या घटनेचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
https://x.com/ANI/status/1758344832479637757?s=20
मृतांचा आकडा 11 वर पोहोचला
दिल्लीतील अलीपूर मार्केटमधील एका पेंट कारखान्यात गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला. आगीची घटना घडली त्यावेळी या पेंट कारखान्यात काही कामगार काम करीत होते. मात्र, या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे या कामगारांना कारखान्यातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या दुर्घटनेत मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दूरवर दिसत होते. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे आजूबाजूची दुकाने आणि काही घरांचे देखील नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत या कारखान्यातील कामगारांच्या व्यतिरिक्त काही लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांनी अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. मात्र, या दुर्घटनेत तोवर 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर 4 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.