मुंबई, 25 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते अनेक बैठका घेत असल्याचे दिसत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील नेत्यांचा असणारा अंतर्गत वाद मिटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे, हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील या आठवड्यातील ही दुसरी बैठक आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
ही बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर पार पडली. यावेळी हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना महायुतीमधील नेत्यांच्या सोबतचा वाद मिटवून घेण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती मतदार संघात महायुतीचा जो कोणी उमेदवार उभा राहील, त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. महायुतीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करू नका. अशाप्रकारचे निर्देश तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वाद मिटवण्यासाठी प्रयत्न
येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी देखील बारामती मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक आहे. अशा परिस्थितीत महायुतीला बारामती मतदार संघातील निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, महायुतीमधील नेत्यांचा अंतर्गत वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. असे असले तरीही हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद मिटला आहे की नाही? हे सांगणे मात्र कठीण आहे.