पुणे, 25 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून नदीपात्रात 40 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
https://x.com/Info_Pune/status/1816269438858953178?s=19
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग
हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणातून आज (दि. 25 जुलै) सकाळी 6 वाजता 40 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तरी पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याचा विसर्ग कमी-जास्त प्रमाणात करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. तसेच या पावसामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1816308249760506350?s=19
अजित पवारांनी घेतला आढावा
दरम्यान, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून चर्चा करून पुणे जिल्ह्यातील पूराची परिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. तसेच गरज पडली नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश अजित पवार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा आणि नागरिकांनी महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.