पुणे, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथील भंगाराच्या गोदामाला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आज (दि.09) सकाळी दहाच्या सुमारास लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ते विझवण्याचे काम करत आहेत. या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, यासंदर्भातील बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
https://x.com/ANI/status/1866002983886196750?t=zhBIRXo05eW6nJxXbfWd2A&s=19
ही आग इतकी भीषण होती की त्यामुळे लांबपासून आकाशात धुरांचे प्रचंड प्रमाणात लोट दिसत होते. त्यामुळे या ठिकाणच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. तर या आगीत सदर गोदामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये भंगाराचे हे गोदाम जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन तेथील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या गोदामाला आग कशी लागली? याची माहिती अजूनही मिळालेली नाही. त्याचा सध्या प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.
काल बावधन परिसरात आग
तत्पूर्वी, पुण्यातील बावधन परिसरातील शिंदे नगर येथील फोटो फ्रेम स्टुडिओला रविवारी (दि.08) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी या स्टुडिओमध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढले. या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही तासानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीच्या घटनेमुळे फोटो स्टुडिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.