पुणे, 16 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कर्वे रोड कर्वे रोड परिसरातील बंद घरातून लाखो रुपयांचे सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. अल्लाबक्ष महंमद पिरजादे (वय 35 रा. रेल्वे भराव, 217 मंगळवार पेठ पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने 7 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कर्वे रोड परिसरातील एका मध्यवर्ती भागातील घरातून सोन्याचे आणि हिरेजडीत दागिने व रोख रक्कम असा एकूण 13 लाख 84 हजार रुपयांचा ऐवज करून नेला होता. याप्रकरणी, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता च्या कलम 331(3), 331(4), 305 (अ) नुसार गुन्हा दाखल केला होता.
सीसीटीव्हीतून आरोपीची ओळख पटली
याप्रकरणी पोलिसांनी या चोरट्याचा शोध घेणे सुरू केले. यावेळी त्यांनी घटनास्थळ पासूनचे विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये पोलीस अंमलदार निलेश साबळे व दत्ता सोनावणे यांना ही चोरी करणारा इसम हा घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अल्लाबक्ष पिरजादे हा असल्याचे लक्षात आले. त्यानुसार, पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मंगळवार पेठ येथील राहत्या घराजवळ सापळा लावला. त्यावेळी या चोरट्याला पोलीस दिसल्याने तो पळू लागला. तेंव्हा पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
सापळा रचून केली अटक
त्यानंतर पोलिसांनी या आरोपीकडे चोरीच्या गुन्ह्याबद्दल विचारणा केली. तेंव्हा सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले. तेंव्हा या आरोपीने चोरी केल्याचे कबूल केले. या चोरट्याने कर्वे रोड परिसरातील या बंद घराच्या कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून आज प्रवेश केला. त्याने या घराच्या खिडकीचे गज त्याच्याकडे असलेल्या लोखंडी पाईपच्या सहाय्याने वाकवले आणि या घरात प्रवेश करून कात्रीच्या सहाय्याने कपाटाचे लॉक उघडले. त्यानंतर त्याने कपाटातील सोन्या-हिऱ्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याचे सांगितले. तसेच त्याने हे दागिने शिवाजीनगर परिसरातील पी.एम.टी डेपो येथील मेट्रो स्टेशनच्या जवळील नदी पात्राच्या कंपाउंड लगत एका दगडाखाली ठेवले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीचा मुद्देमाल दुसरीकडे लपविला होता
त्यानुसार, पोलिसांनी त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पिशवीमध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम ताब्यात घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून त्याने केलेल्या वेगवेगळ्या चोरीतील एकूण 17 लाख 64 हजार 060 रुपयांचे 20 तोळे वजनाचे हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि 8 हजार रुपयांची रोख रक्कम असा 17 लाख 72 हजार 060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.