10 एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नायगाव, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 193 वा जयंती सोहळा आज त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1742512342880096481?s=19



यावेळी मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांनी या गावातील सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. तसेच त्यांनी गावात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शिल्पसृष्टीला भेट देऊन त्याची पाहणी केली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनेच्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना तसेच ‘महाज्योती’ मार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1742513805979246969?s=19



“क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे वर्षभर लोकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी, यासाठी 10 एकर जागा शासन खरेदी करेल. त्या जागेवर 100 कोटी रुपये निधी खर्चून भव्य स्मारक उभारण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, त्याग, योगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे आपला अभिमान असून त्यांच्या कार्याचे स्मरण पुढच्या हजारो पिढ्यांना राहावे, यासाठी त्यांचे भिडे वाड्यात मोठे स्मारक उभे करण्यात येत असल्याची माहिती देखिल मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *