बारामती, 23 ऑगस्टः बारामती तालुक्यातील गुणवडी गावामधील कस्तान चाळ येथून 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 च्या सुमारास चार मुली आणि एक मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी पसरली. पाचही मुले मुली हे सख्खे मावस भाऊ बहिण आहेत. त्यांची नावे अनुक्रम राधिका साठे (13 वर्ष), प्रज्योत साठे (11 वर्ष) दोघे गुणवडी गावातील आहेत. तर, प्रतीक्षा कुचेकर (14 वर्ष), साक्षी कुचेकर (13 वर्ष), मानसी कुचेकर (11 वर्ष) या तिघीही माळेगाव येथील असून मावशीच्या घरी आल्या होत्या. एकाच गावातील अल्पवयीन मुलं-मुली गायब झाल्याने गुणवडी गावात लहान मुलांना पकडणारी टोळी आलेली आहे, अशी अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली.
सदर घटनेची माहिती नातेवाईकांनी बारामती शहर पोलिसांना 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास कळवली. घटनेची गंभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, तुषार चव्हाण, अक्षय सीताप, शाहू राणे यांच्या पथकाला गुणवडीला जाऊन तपास करण्यास सांगितले. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पोलीस पाटलाच्या मदतीने चोहो बाजूने तपास सुरु केला. तपास करत असताना मेखळी येथील एका दुकानदाराने ती पाच मुल-मुली पाहिल्याचे सांगितले. तसेच ती पाच जण वालचंदनगरचा रस्ता असल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलीस मित्रांना सोबत घेत पोलिसांनी शोध मोहीम ही वालचंदनगरच्या दिशेने सुरु केली.
सामुहिक बलात्काराने इंदापूर हादरलं
सायंकाळी 7 च्या सुमारास वालचंदनगर जंक्शन येथे पाच पैकी दोन मुली पोलिसांना आढळून आल्या. त्या मुलींनी पोलिसांना सांगितले की, त्यांना ओमनी गाडीतून मामाकडे भेटायला घेऊन जात आहे, असे सांगून गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना वालचंदनगरमध्ये सोडल्याची हाकिकत सांगितली. काही वेळात आणखीन दोन मुली सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलींना विचारात घेत चौकशी केली. त्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला.
त्या मुलांनी कबुली दिली की, त्यांना कोणीही ओमनी गाडीतून अपहरण केलेले नाही. सर्व मुले अभ्यास करत नाही म्हणून त्यांचा मामा रागवतो. तसेच सकाळीच त्याने प्रज्योत याला सुद्धा खडसावले होते. म्हणून त्या सर्वांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आता पोलीस आणि नातेवाईक रागावतील म्हणून त्यांनी या प्रकारचा बनाव केल्याचे सांगितले. प्रज्योत याने घरीच चीठी सुद्धा लिहून ठेवलेली आहे की, त्यांचा शोध घेऊ नका, ते मोठे बनूनच घरी येतील.
प्रज्योत हा पोलीस व नातेवाईकांना बघून पळून जाऊ लागला. त्यानंतर रात्री उशिरा 8.30 च्या सुमारास त्यालाही ताब्यात घेतले. बालकांच्या दोघी आई ह्या सख्या बहिणी असून त्या दोघी सकाळी दवाखान्यात दहा वाजता बारामतीला आलेले असताना सर्व मुलांनी घरातून जाण्याचा निर्णय घेतला. नंतर रोडला येऊन ट्रक चालकाला विनंती करून वालचंदनगर जंक्शन या ठिकाणी उतरल्या.
सदर तपास पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि तत्परतेने करत सर्व मुले पालकांच्या ताब्यात दिली. त्या ठिकाणी पालकांचेही पोलिसांनी सामुपदेशन केले. सदरचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला.