पुणे, 14 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सिक्रेट वर्ल्ड नावाच्या इमारतीला लागलेल्या या आगीमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती पुणे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, ही आग लागल्यानंतर तातडीने पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळवण्यात आले.
https://x.com/ANI/status/1900911150495395944?t=KpiStp3P9emZvADahuLiyg&s=19
आग विझविण्यात यश
त्यानुसार, अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या तासभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सुदैवाने जीवितहानी टळली
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामुळे इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. याआगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने काही लोकांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
घटनेचा तपास सुरू
त्यावेळी घटनास्थळी पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला असून, नेमकी आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले याची माहिती लवकरच स्पष्ट होणार आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली, तरी अशा घटनांमधून भविष्यातील सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.