दिल्ली, 18 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही काळापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या शिष्टमंडळात खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार ठाकरे गटाची आज एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी हे शिष्टमंडळ आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांपर्यंत वाढवावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार आहे. यासाठी राष्ट्रपतींनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. तर जरांगे पाटील हे सध्या राज्यभरात मराठा समाजाची भेट घेत आहेत. यावेळी ते मराठा समाजातील लोकांना सभेच्या माध्यमातून संबोधित करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
तर दुसरीकडे मात्र राज्यातील ओबीसी समाजाचे नेते देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण द्या, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी काल जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाच्या वतीने महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ओबीसी समाजाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. तसेच या महासभेसाठी लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.
One Comment on “ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार”