रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर

मुंबई, 10 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (दि.09) रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांना उद्योग, राजकीय, बॉलिवूड जगतातील विविध मान्यवरांनी तसेच देशातील सर्वसामान्य लोकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रात गुरूवारी (दि.10) एक दिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1844204900843913599?t=cUihDtl-i9gVpQ7H-w5A9A&s=19

मुख्यमंत्र्यांची घोषणा

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच राज्यात मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

https://x.com/mieknathshinde/status/1844093982370050382?t=5UlFXjmwzOGk0jp0AHWxVg&s=19

मुख्यमंत्री शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

तत्पूर्वी, रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. दुर्मिळ रत्न हरपले. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री यामध्ये म्हणाले.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1844091956567126264?t=eX9qYpXmWv0AtwNdU5yVEA&s=19

देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली

तसेच, ज्येष्ठ उद्योगपती श्री रतन टाटा जी यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.” रतन टाटा हे एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण-आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असे फडणवीस यावेळी म्हणाले.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1844085150944047179?t=-qncPRaOYKwLhbbaOL9QFQ&s=19

अजित पवारांकडून शोक व्यक्त

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “दिग्गज उद्योगपती आणि समाजसेवी रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले. एक उद्योगपती म्हणून त्यांच्या अमूल्य योगदानाव्यतिरिक्त त्यांनी परोपकार आणि करूणेचा वारसा सोडला आहे, जो त्यांच्या देशावरील अपार प्रेमाने अधोरेखित झाला आहे. या दु:खाच्या वेळी माझ्या प्रार्थना त्यांच्या प्रियजनांसोबत आणि लाखो चाहते आणि हितचिंतकांसोबत आहेत,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *