मुंबई, 29 मार्च: आयपीएल संघाच्या चाहत्यांमध्ये वाद झाल्याचे आपल्याला नेहमी पाहायला मिळत असते. मात्र आता रोहित शर्मा आऊट झाल्याच्या रागातून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी येथे घडली. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद यांच्यात बुधवारी सामना झाला. या सामन्यात रोहित शर्माची विकेट पडली. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्याने जल्लोष केला. याचा राग मनात धरून मुंबईच्या दोन चाहत्यांनी चेन्नईच्या या चाहत्याला मारहाण केली. या घटनेत चेन्नईचा चाहता गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अशी घडली घटना
बळवंत झांजगे (50) आणि सागर झांजगे (35) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर या घटनेत बंडोपंत तिबिले (63) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, बळवंत झांजगे आणि सागर झांजगे मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना पाहत होते. या सामन्यात हैदराबादने मुंबई समोर 278 धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा रोहित शर्मा आऊट झाला. त्यावरून बंडोपंत तिबिले यांनी आता मुंबई कशी जिंकणार? असा सवाल करीत बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या दोघांना डिवचले. सोबतच बंडोपंत तिबिले यांनी चैन्नई सुपर किंग्ज संघाचे कौतुक केले. त्याच्या रागातून बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या दोघांनी बंडोपंत तिबिले यांना मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यात फळी घातली.
या घटनेमुळे खळबळ!
त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात. दरम्यान, देशभरात सध्या आयपीएलचा उत्साह आहे. त्यातच अशी घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. तर चाहत्यांनी क्रिकेट सामना हा मनोरंजन म्हणून घेण्याची गरज असल्याचे या घटनेवरून दिसते.