इंदापूर, 1 सप्टेंबरः इंदापूर येथील कांबळी गल्लीमधील एका व्यक्तीला तानाजी पाटील या सावकाराने जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी गजाने डोक्यात मारहाणीची घटना घडली आहे. या मारहाणीत प्रताप पलंगे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर प्रकरणी अॅट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीत गणपतीचे हर्षोल्हासात आगमन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप पलंगे यांनी पत्नीच्या उपचारासाठी सावकार तानाजी पाटील यांच्याकडून 1 लाख रुपये 5 टक्के व्याजाने घेतले होते. त्याच्या बदल्यात प्रताप पलंगे यांनी तानाजी पाटील यांना 1 लाख 40 हजार रुपये माघारी दिले होते. तरी देखील तानाजी पाटील हे त्यांना मुद्दल म्हणून आणखीन 1 लाख रुपये मागत होता. या कारणावरून तानाजी पाटील आणि प्रताप पलंगे यामध्ये वाद झाला. सावकार तानाजी पाटील यांनी प्रताप पलंगे यांना जातीवाचक शिवीगाळ केला. तसेच पलंगेंच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरून त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला.
सदर प्रकरण संदर्भात अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय इंगोले यांनी आवाज उठवला आहे. या नंतर पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने इंदापूर पोलीस स्टेशनने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अॅट्रोसिटी) तसेच बेकायदेशीर सावकारी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात पुढील तपास बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.