टपाली मतपत्रिकेचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल

मुंबई, 16 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एका पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक शिंदे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान केले. त्यानंतर पोलीस शिपाई गणेश शिंदे यांनी त्यांच्या मोबाईलवरून या मतपत्रिकेचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. सोशल मीडियावर मतपत्रिकेचा फोटो व्हायरल करून गोपनियता भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली आहे.

https://x.com/electionmumbai/status/1857498309838913857?t=t-Rxvf1BixjBeds64r6GjA&s=19

टपाली मतदान प्रक्रियेला सुरूवात

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सध्या राज्यात टपाली मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोगाने केवळ अत्यावश्यक सेवेत मतदानाच्या दिवशी कार्यरत असल्यामुळे मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सैन्य दलातील अधिकारी, तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येते. ही मतदान प्रक्रिया अतिशय गोपनीय पद्धतीने पार पडत असते. त्यावेळी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणाऱ्या मतदारांनी मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका लिफाफ्यात बंद करून तो लिफाफा बंद अवस्थेत मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकणे बंधनकारक असते.



महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून सध्या अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच यासंदर्भात त्यांच्याकडून राज्यभरात जनजागृती केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *